नवी दिल्ली: किक्रेटप्रेमी वर्ल्डकपची वाट उत्सुकतेने पाहत आहेत. आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) पुरुष एकदिवसीय वर्ल्डकप 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. यावेळी भारत वर्ल्डकपचे आयोजन करत असल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु आयसीसीने वर्ल्डकपच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यामुळे कदाचित क्रिकेटप्रेमी जरा नाराज होऊ शकतात. ठरलेल्या दिवसाआधीच भारत-पाकिस्तानचा रोमांचकारी सामना आपल्याला पाहता येणार आहे.
तारखांमध्ये बदल: भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. हा सामना 15 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता. परंतु हा सामना आता 14 ऑक्टोबरला होणार आहे. कारण 15 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. यामुळे आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडे तारीख बदलण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला पीसीबीने मंजुरी दिली आहे. आयसीसीने भारत-पाकिस्तान आणि पाकिस्तान-श्रीलंकेच्या सामन्याचीही तारीख बदलली आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानचा सामना 12 ऑक्टोबरला होणार होता. हा सामना आता 10 ऑक्टोबरला झाला तर इंग्लंड आणि बांगलादेशचे वेळापत्रक बिघडणार आहे. कारण इंग्लंड आणि बांगलादेशाचा सामना 10 ऑक्टोबरला होणार आहे.
अंतिम वेळापत्रक बाकी: यामुळे 12 तारखेला कोणता सामना होणार आहे, हे आयसीसीचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान आयसीसीकडून सामन्यांच्या वेळापत्रकात अजून काही बदल केले जाऊ शकतात. यामुळे 12 ऑक्टोबरला श्रीलंका आणि पाकिस्तानच्या सामन्याऐवजी कोणता सामना होणार आहे. याची स्पष्टता आता आयसीसीच्या अंतिम वेळापत्रकातूनच होईल. दरम्यान तारखांचा असा गोंधळ होत असल्याने वर्ल्डकपमधील सामन्यांमध्ये अजून अनेक बदल होण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना: भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा खेळवला जाईल. PCB ने या तारीख बदलाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शिवाय यासह इतर 2 सामन्यांच्या तारखा बदलण्याच्या ICC आणि BCCI च्या प्रस्तावालाही सहमती दर्शवली आहे. याशिवाय पाकिस्तानी संघ आता 12 ऑक्टोबरऐवजी 10 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाला 3 दिवसांचा पुरेसा वेळ देता यावा, यासाठी असे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा-