नवी दिल्ली : महिला टी-20 विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीत भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ रोमांचक सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाकडून पाच धावांनी पराभूत झाला. या पराभवाचे एक कारण म्हणजे कर्णधार हरमनप्रीत सामन्यात मोक्याच्या वेळी अत्यंत निष्काळजीपणे धावबाद झाली. हरमनप्रीत सामन्याच्या 15व्या षटकात धावबाद झाली. ती ज्या पद्धतीने बाद झाली, त्यावरून आता तिच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण जेव्हा ती बाद झाली तेव्हा तिची बॅट पुढे नाही तर मागे होती.
क्रीजमध्ये परतण्याचा पुरेसा प्रयत्न केला नाही : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौरने शानदार फलंदाजी केली. तिने अवघ्या 34 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी खेळली. हरमनप्रीतने या खेळीदरम्यान सहा चौकार आणि एक षटकार मारला. पण 15 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तिने दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात तिची विकेट गमावली. धावताना हरमनप्रीतची बॅट पुढे असती तर कदाचित ती क्रीज मध्ये वेळेत पोहचली असती. तसेच तिने झेप घेऊन क्रीजमध्ये परतण्याचाही प्रयत्न केला नाही. बाद झाल्यानंतर मात्र तिने आपला सगळा राग बॅटवरच काढला. तिने रागाने बॅट जमिनीवर आपटली.
हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट : उपांत्य फेरीतील महत्वपूर्ण सामन्यात हरमनप्रीत अशा प्रकारे बाद झाल्याने तिच्या अनुभवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. हरमनने 151 टी-20 सामने खेळले आहेत. त्यात तिने 136 डावात 3058 धावा केल्या आहेत. याशिवाय तिने 124 एकदिवसीय सामन्यांच्या 105 डावांमध्ये 3322 धावा केल्या आहेत. हरमनप्रीत कौरने तीन कसोटी सामनेही खेळले आहेत. तिने कसोटीच्या पाच डावात 38 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतक्या प्रदीर्घ अनुभवानंतरही तिची उपांत्य फेरीतील बाद होण्याची पद्धत भारतीय प्रेक्षकांना आवडली नाही. माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने ट्विट करत म्हटले की, हरमप्रीतचे धावबाद होणे हा सामन्याचा टर्निंग पॉइंट होता.
ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत : टी20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 167 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने सर्वाधिक 54 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगने नाबाद 49 धावा फटकावल्या. ऍशले गार्डनरने 31 धावा केल्या. एलिसा हिलीने 25 आणि ग्रेस हॅरिसने 7 धावा केल्या. तर एलिस पेरी 2 धावा करून नाबाद राहिली. भारताकडून शिखा पांडेने 2 तर राधा यादव आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा : Gautam Gambhir on KL Rahul : गौतम गंभीरचा खराब कामगिरी करणाऱ्या राहुलला पाठिंबा, म्हणाला..