ओवल - भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरोधात ओवलमध्ये खेळला जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत दुसऱ्या डावात 6 बाद 329 धावा केल्या आहेत आणि यासह भारताकडे 230 धावांची आघाडी मिळाली आहे. उपाहारापर्यंत शार्दुल ठाकूर 11 तर ऋषभ पंत 16 धावांवर नाबाद होते.
भारताने आज 3 बाद 270 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली. रविंद्र जडेजाला पायचित करत ख्रिस वोक्सने भारताला चौथा धक्का दिला. जडेजाने 17 धावा केल्या. यानंतर भारताला अजिंक्य रहाणेच्या रुपाने मोठा झटका बसला. ख्रिस वोक्सने त्याच्या पुढील षटकात अजिंक्य रहाणे पायचित केलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर विराट कोहलीने ऋषभ पंतच्या साथीने भारतीय संघाला तीनशेचा टप्पा पार करून दिला. विराट कोहली मोठी खेळी करणार असे वाटत असताना तो मोईन अलीच्या फिरकी जाळ्यात अडकला.
विराट कोहली, मोईन अलीचा ठरला बळी
मोईन अलीच्या चेंडूवर क्रेग ओव्हरटन याने पहिल्या स्लिपमध्ये विराटचा झेल घेतला. विराट कोहलीने 96 चेंडूत 7 चौकारांसह 44 धावांची खेळी केली. विराट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर जोडीने संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. दोघांनी उपहारापर्यंत भारताला 329 धावांपर्यंत पोहोचवले. ऋषभ पंत 16 तर शार्दुल ठाकूर 11 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सन आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. तर जेम्स अँडरसन आणि मोईन अली यांना प्रत्येकी 1-1 गडी टिपता आला.
दरम्यान, भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्या डावात 191 धावा केल्या. तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा केल्या आहेत. भारतीय संघ दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत सामन्यावर मजबूत पकड निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.
हेही वाचा - Eng vs Ind : के एल राहुलवर आयसीसीची कारवाई; जाणून घ्या कारण
हेही वाचा - ENG vs IND: रवी शास्त्रींना कोरोनाची लागण, प्रशिक्षकांसह 4 जण विलगीकरणात