चेन्नई - चेन्नईतील चेपॉक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना पार पडला. यात पाहुण्या इंग्लंडने भारताला २२७ धावांनी मात देत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने पहिल्या डावात शानदार द्विशतक ठोकत सामनावीराचा किताब पटकावला. इतकेच नव्हे, तर कर्णधार म्हणून त्याने आपल्याच संघाच्या माजी कर्णधाराची बरोबरी केली.
कर्णधार म्हणून इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी विजय नोंदवण्याच्या बाबतील रूटने संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. रूटने ४७ कसोटी सामन्यांत २६ विजय मिळवले आहेत. तर, वॉनने कर्णधार म्हणून ५१ सामन्यांत २६ विजय मिळवले होते.
हेही वाचा - ''विकेटकीपिंगच्या बाबतीत पंत पाळण्यातल्या मुलासारखा'', दिग्गज क्रिकेटपटूने दिले मत
२०१७मध्ये अॅलिस्टर कुकच्या हातून इंग्लंड संघाची धुरा रूटकडे सोपवण्यात आली. कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांच्या यादीत रूट पाचव्या स्थानी आहे. कुकने ५९, मायकल अथर्टनने ५४, वॉनने ५१, अँड्र्यू स्ट्राउसने ५० सामन्यात इंग्लंड संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.
विशेष म्हणजे, रूटने भारतात ठोकलेल्या प्रत्येक शतकाच्या सामन्यात इंग्लंडने विजय साकारला आहे. चेन्नई कसोटीतील शतक हे रूटचे भारताविरुद्धचे पाचवे शतक होते. तर, २१८ धावांची खेळी ही भारताविरुद्धची त्याची पहिली द्विशतकी खेळी ठरली.
चेन्नईत पाहुण्यांचा मोठा विजय -
इंग्लंडने चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभारला. तेव्हा भारतीय संघ पहिल्या डावात ३३७ धावांवर सर्वबाद झाला. यात इंग्लंड संघाला मोठी आघाडी मिळाली त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १९२ धावांत ऑलआऊट झाला आणि इंग्लंडने हा सामना २२७ धावांनी जिंकला.