अहमदाबाद - कर्णधार म्हणून भारतात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या कामगिरीत विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे. मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी भारताने इंग्लंडला १० गडी राखून पराभूत केले. या विजयासह विराटच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत भारतात २९ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. तर, धोनी भारतातील ३० कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार होता. कोहलीने आता कर्णधार म्हणून भारतात २२ कसोटी सामने जिंकले आहेत, तर धोनीच्या नावावर २१ कसोटीविजयाची नोंद आहे. कर्णधार म्हणून कोहलीने घरच्या मैदानावर खेळताना दोन कसोटी सामने गमावले, तर पाच कसोटी सामने अनिर्णित राखले आहेत. त्याचवेळी धोनीने तीन कसोटी सामने गमावले असून सहा कसोटी सामने अनिर्णित राखले आहेत.
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने भारतामध्ये २० कसोटी सामन्यांमध्ये १३ विजय संपादन केले आहेत. यात त्याने ४ सामने गमावले असून ३ सामने अनिर्णित राखले आहेत. कर्णधार म्हणून सौरव गांगुलीने २१ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात १० विजय मिळाले आहेत. गांगुलीच्या नेतृत्वात खेळताना भारताने कसोटीत ३ पराभव पत्करले आहेत, तर, ८ सामने अनिर्णित राखले आहेत.
लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या नेतृत्वात भारताने भारतात २९ पैकी ७ कसोटी सामने जिंकले असून २० सामने अनिर्णित राखले आहेत. तर, २ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.