अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा पहिला डाव ३६५ धावांवर आटोपला आहे. भन्नाट फॉर्मात खेळणाऱ्या अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. अक्षर पटेल ४३ धावांवर परतल्यानंतर बेन स्टोक्सने इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या शेवटच्या फलंदाजांना शून्यावर गुंडाळले. त्यामुळे सुंदर ९६ धावांवर नाबाद राहिला. भारताकडे आता १६० धावांनी आघाडी आहे.
कालच्या ७ बाद २९४ धावसंख्येवरून भारताने आज तिसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी डावाला आकार दिला. या दोघांनी शतकी भागीदारी रचली. अक्षर अर्धशतकाकडे कूच करताना धावबाद झाला. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या दोन फलंदाजांना एकही धाव जमवता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूला असलेल्या सुंदरला शतकाशिवाय तंबूत परतावे लागले. इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन स्टोक्सने ४, जेम्स अँडरसनने ३ तर, जॅक लीचने २ बळी घेतले.
पंत-सुंदरची जोडी जमली -
दीडशेच्या आत भारताचे सहा फलंदाज बाद झाले असताना रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी टिच्चून फलंदाजी केली. या दोघांनी मिळून शंभरपेक्षा जास्त धावा जमवल्या. काही सामन्यांपासून नव्वदीत अडकलेला पंत शतक करण्यात यशस्वी ठरला. पंतने ११८ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकार लगावत १०१ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक -
- नाणेफेक - इंग्लंड (फलंदाजी)
- इंग्लंड पहिला डाव - २०५/१० (बेन स्टोक्स ५५, अक्षर पटेल ४/६८)
- भारत पहिला डाव - ३६५/१० (रिषभ पंत १०१, बेन स्टोक्स ४/८९)
हेही वाचा - स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम