चेन्नई - एम. ए. स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी सावध सुरुवात केली आहे. उपाहारापर्यंत भारताच्या २ बाद ५९ धावा झाल्या असून कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने भारताला सुरुवातीला दणके दिले. आर्चरने सलावीर रोहित शर्माला (६) आणि शुबमन गिलला (२९) बाद केले. जो रूटचे द्विशतक आणि स्टोक्स-सिब्ले यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ५७८ धावा केल्या आहेत.
तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ८ बाद ५५५ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने २३ धावांची भर घातली. सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या उर्वरित दोन फलंदाजांना माघारी धाडण्यात यश आले. जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी तीन बळी घेतले.
हेही वाचा - स्टीव्ह स्मिथ ठरला ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू
पहिल्या डावात इंग्लंड सरस -
या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने ३७७ चेंडूत सर्वाधिक २१८ धावा केल्या. या खेळीत रूटने १९ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्याशिवाय बेन स्टोक्सनेही ८२ धावांची खेळी केली. तसेच डॉम सिब्लेने ८७ धावांची खेळी केली होती. याशिवाय डॉमनिक बेस(३४), जोस बटलर (३०), ऑली पोप (३४), रोरी बर्न्स (३३) यांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले.
भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम.
इंग्लंडचा संघ –
रोरी बर्न्स, डोमिनिक सिब्ले , डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (यष्टिरक्षक), डोमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अँडरसन.