चेन्नई - चेपॉक मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने १ बाद ५४ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावात गुंडाळल्यानंतर भारताला दुसऱ्या दिवसाअखेर २४९ धावांची आघाडी मिळाली आहे. सलामीवीर रोहित शर्मा २५ तर, चेतेश्वर पुजारा ७ धावांवर नाबाद खेळत आहेत. शुबमन गिल १४ धावांवर बाद झाला, त्याला जॅक लिचने पायचित केले. सामन्याच्या केवळ दुसऱ्याच दिवशी भारताने चांगली पकड मिळवली आहे.
सकाळच्या सत्रात भारताचा पहिला डाव ९५.५ षटकात ३२९ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने फलंदाजीला सुरुवात केली. भारतीय फिरकीपुढे इंग्लंडची चांगलीच दाणादाण उडाली. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने रोरी बर्न्सला शुन्यावर माघारी धाडत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर कर्णधार जो रूट, डॉमिनिक सिब्ले आणि डॅनियल लॉरेन्स स्थिरावू शकले नाहीत. अश्विनने सिब्ले आणि लॉरेन्सला बाद केले. तर, कसोटी पदार्पण केलेल्या अक्षरला रूटच्या रुपात पहिली विकेट मिळाली.
रवीचंद्रन अश्विनच्या प्रभावी फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज गडबडले. अश्विनने पाच विकेट घेत पाहुण्या संघाला १३४ धावांत तंबूत धाडले. स्टुअर्ट ब्रॉडला शून्यावर त्रिफळाचित करून अश्विनने इंग्लंडचा डाव संपवला. इंंग्लंडचा यष्टिरक्षक फोक्स याने सर्वाधिक नाबाद ४२ धावा केल्या. इशांत शर्मा व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ तर, मोहम्मद सिराजने १ बळी घेतला. भारताकडे १९५ धावांची आघाडी आहे.
पहिल्या सत्रात आटोपला भारताचा डाव -
भारतीय फलंदाजांनी आज ६ बाद ३०० धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. रिषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला चांगली साथ लाभली नाही. रिषभने ७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५८ धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात मोईन अलीने सर्वाधिक चार बळी टिपले. तर, ओली स्टोनला तीन, जॅक लीचला दोन आणि रूटला एक बळी घेता आला.
भारताचा पहिला डाव -
नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर विराटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. काही सामन्यांपासून उत्तम लयीत असलेला शुबमन गिल आणि रोहित शर्माने सलामी दिली. मात्र, दुसर्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली स्टोनने गिलला शुन्यावर पायचित पकडले. शुबमननंतर अनुभवी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने डाव सांभाळला. या दोघांनी ८५ धावांची भागीदारी रचली. खेळपट्टीवर स्थिरावू पाहणाऱ्या पुजाराला जॅक लीचने बाद करून भारताला दुसरा धक्का दिला. पुजारा ५८ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. पुजारापाठोपाठ विराट कोहलीली शुन्यावर बाद झाला. फिरकीपटू मोईन अलीच्या वळलेल्या चेंडूवर विराटची दांडी गुल झाली. यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला.
रोहितने आक्रमक तर, अजिंक्यने संयमी खेळी करत धावफलक हलता ठेवला. रोहितने अवघ्या ४७ चेंडूत नाबाद अर्धशतक झळकावले. त्यानंतर १३० चेंडूत त्याने नाबाद १०० धावाही चोपल्या. शतकी खेळीचे दीडशतकी खेळीत रुपांतर करून रोहित बाद झाला. रोहितपाठोपाठ अजिंक्यदेखील एका धावेच्या अंतराने माघारी परतला. अजिंक्यने १४९ चेंडू खेळून काढत ४ चौकार आणि एका षटकारासह ६७ धावांची खेळी केली. त्याला मोईन अलीने त्रिफळाचित केले. या दोघानंतर रिषभ पंत आणि अश्विनची जोडी मैदानात आली. मात्र, कामचलाऊ गोलंदाज जो रूटने रवीचंद्रन अश्विनला (१३) झेलबाद केले. पहिला दिवस संपेपर्यंत पंत आणि अक्षर पटेल नाबाद होते.
हेही वाचा - VIDEO : चेन्नई कसोटीत पंत-स्टोक्समध्ये जुंपली...चाहत्यांनी केली घोषणाबाजी