चेन्नई - चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर आटोपला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ लवकर बाद होईल असे वाटत असताना वॉशिंग्टन सुंदर खेळपट्टीवर उभा राहिला. त्याने अर्धशतक झळकावत भारताला तीनशेपार पोहोचवले. उपाहारापर्यंत इंग्लंडने १ बाद १ धाव केली असून त्यांनी सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्सला शून्यावर गमावले. अश्विनने बर्न्सला रहाणेकरवी झेलबाद केले. इंग्लंडकडे अद्याप २४२ धावांची आघाडी आहे.
हेही वाचा - उत्तराखंड हिमप्रलय : बचावकार्यासाठी रिषभ पंतने दिले एका सामन्याचे मानधन
चौथ्या दिवशी भारताने ६ बाद २५७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. जॅक लीचने रवीचंद्रन अश्विनच्या रुपात इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. अश्विनने ३१ धावा केल्या. एकीकडे, वॉशिंग्टन सुंदर इंग्लंडच्या गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. तर, दुसरीकडे त्याला योग्य साथ लाभली नाही. सुंदरने १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा केल्या. या डावात इंग्लंडकडून डॉम बेसने ७६ धावांत ४ तर, जॅक लीच, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनने प्रत्येकी २ बळी घेतले.
पुजारा-पंतने सावरले
तत्पूर्वी, भारताकडून चेतेश्वर पुजारा (७३) आणि रिषभ पंत (९१) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. इंग्लंडच्या विशाल ५७८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. जोफ्रा ऑर्चरने रोहित शर्माला बाद करत भारतीय संघाला पहिला धक्का दिला. रोहितने ६ धावा केल्या. यानंतर ऑर्चरनेच शुबमन गिलला वैयक्तिक २९ धावांवर बाद करत भारताला बॅकफूटवर ढकलले. कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा ही जोडी भारतीय संघाचा डाव सावरणार असे वाटत असताना, कर्णधार कोहली बाद झाला. त्याला डोम बेस याने ओली पोप करवी झेलबाद केले. विराटने ११ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील १ धाव काढून बाद झाला. अनुभवी पुजाराने रिषभ पंतसोबत भागीदारी केली. पुजारा वैयक्तिक ७३ धावांवर बाद झाला. त्याला बेसने रोरी बर्न्सकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर रिषभ पंत नर्व्हस नाईंटीचा शिकार बनला. पंत बेसच्या गोलंदाजीवर ९१ धावांवर बाद झाला.
इंग्लंडचा ५७८ धावांचा डोंगर -
या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने ३७७ चेंडूत सर्वाधिक २१८ धावा केल्या. या खेळीत रूटने १९ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्याशिवाय बेन स्टोक्सनेही ८२ धावांची खेळी केली. तसेच डोम सिब्लेने ८७ धावांची खेळी केली होती. याशिवाय डॉमनिक बेस (३४), जोस बटलर (३०), ऑली पोप (३४), रोरी बर्न्स (३३) यांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले. सांघिक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात भारतासमोर ५७८ धावांचा डोंगर उभारला. जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर, नदीम आणि इशांतला प्रत्येकी दोन बळी मिळवता आले.