लीड्स - भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील तिसरा सामना यजमान संघाने 1 डाव आणि 76 धावांनी जिंकला. हेडिंग्ले (लीड्स) येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघ चौथ्या दिवशी, दुसऱ्या डावात 278 धावांत ढेपाळला. भारतीय संघाचा हा या वर्षातील सर्वात मोठा पराभव आहे. इंग्लंडने या विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताने लॉर्डस् येथे झालेल्या मागील सामन्यात विजय मिळवला होता.
भारतीय संघाने चौथ्या दिवशी 2 बाद 215 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली आणि 278 धावांपर्यंत भारतीय संघ ऑलआउट झाला. अवघ्या 63 धावांत भारताने 8 गडी गमावले. यात चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजने आपली विकेट फेकली.
भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 91 धावांची खेळी साकारली. याशिवाय विराट कोहलीने 55 धावांचे योगदान दिले. भारतीय संघ पहिल्या डावात 78 धावांमध्ये ऑलआउट झाला होता. तर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा करत 354 धावांची आघाडी घेतली होती. दरम्यान, उभय संघातील पुढील चौथ्या सामन्याला 2 सप्टेंबरपासून केनिंग्टन ओवलमध्ये सुरूवात होणार आहे.
पहिल्या डावात 78 धावांत गारद झाली टीम इंडिया -
टीम इंडिया पहिल्या डावात 78 धावांत ढेपाळली. भारताच्या फक्त दोन फलंदाजांना दोन आकडी, आकडा गाठता आला. रोहित शर्माने सर्वाधिक 19 धावांचे योगदान दिले. तर विराट कोहली (7), चेतेश्वर पुजारा (1), लोकेश राहुल (0), अजिंक्य रहाणे 18 आणि ऋषभ पंतने 2 धावा केल्या. जेम्स अँडरसन आणि क्रेग ओवरटन यांनी प्रत्येकी 3-3 गडी बाद केले. ऑली रॉबिनसन आणि सॅम कुरेन यांनी 2-2 गडी बाद केले.
इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर आटोपला -
इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 432 धावांवर आटोपला. कर्णधार जो रुटने या मालिकेतील तिसरे शतक झळकावले. त्याने 121 धावांची ताबडतोड खेळी केली. याशिवाय रोरी बर्न्स (61), हसीब हमीद (68) डेविड मलानने 70 धावांचे योगदान दिले. भारताकडून सर्वाधिक 4 गडी मोहम्मद शमीने बाद केले. तर मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
हेही वाचा - IND vs ENG 3rd test : भारताचे जोरदार प्रत्युत्तर, पुजाराची संयमी खेळी