चेन्नई - इंग्लंडविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात ३२९ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या पहिल्या डावातील कामगिरीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नावावर एक जबरदस्त विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तब्बल ६६ वर्ष जुन्या विक्रमाला मोडित काढले.
हेही वाचा - आयपीएल लिलाव : ४२ वर्षीय क्रिकेटपटूसाठी कोण लावणार बोली?
भारताने काढलेल्या ३२९ धावांमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी एकही अवांतर धाव दिली नाही. यासह सर्वाधिक धावा करताना एकही अवांतर धाव न देण्याचा विक्रमही मोडित निघाला आहे. १९५५मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध अशी कामगिरी नोंदवली होती. लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध ३२८ धावा केल्या. यात भारतीय गोलंदाजांनी एकही अवांतर धाव दिली नाही.
अवांतर धावांशिवाय सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम -
- ३२९ भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई २०२०/२१
- ३२८ पाकिस्तान विरुद्ध भारत, लाहोर १९५४/५५
- २५२ दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, डर्बन १९३०/३१
- २४७ दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, ट्रेंट ब्रिज १९६०
- २३६ ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न १८९१/९२
- २३४ बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन २०१८/१९
भारताचा पहिला डाव -
रोहित शर्माच्या द्विशतकी, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या आहेत. वरच्या फळीचे तीन फलंदाज स्वस्तात गमावल्यानंतर रोहित आणि अजिंक्यने १६२ धावांची भागीदारी रचली. फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर रोहितने आक्रमक पवित्रा धारण करत १६१ धावा तडकावल्या. त्याच्या खेळीत १८ चौकार आणि २ चौकारांचा समावेश होता. तर, अजिंक्यने १४९ चेंडू खेळून काढत ४ चौकार आणि एका षटकारासह ६७ धावांची खेळी केली. त्यानंतर रिषभ पंतने डावाच्या शेवटी एकट्याने किल्ला लढवत अर्धशतक केले. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५८ धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात मोईन अलीने सर्वाधिक चार बळी टिपले. तर, ओली स्टोनला तीन, जॅक लीचला दोन आणि रूटला एक बळी घेता आला.