ब्रिस्टोल (इंग्लंड) - भारताची महिला क्रिकेटपटू स्नेह राणाने डेब्यू सामन्यात एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. ती एका डावात ४ गडी बाद करणारी आणि फलंदाजीत ५० हून अधिक धावा करणारी भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. यासोबत ती असा पराक्रम करणारी जगातील चौथी खेळाडू ठरली.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात एकमात्र कसोटी सामना खेळवण्यात आला. इंग्लंड संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव ९ बाद ३९६ धावांवर घोषित केला. यात स्नेह राणाने इंग्लंडचे ४ गडी बाद केले. त्यानंतर भारतीय संघ अडचणीत असताना दुसऱ्या डावात स्नेह राणा हिने जबरदस्त खेळी केली. तिने १५४ चेंडूचा सामना करताना नाबाद ८० धावांची खेळी साकारली. यात १३ चौकारांचा समावेश आहे.
उभय संघातील सामना अनिर्णीत -
स्नेह राणाच्या नाबाद ८० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला चौथ्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडविरुद्धच्या सामना अनिर्णित राखण्यात यश आलं. इंग्लंडने आपला पहिला डाव ३९६ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरादाखल भारताचा पहिला डाव २३१ धावांत आटोपला. तेव्हा यजमान इंग्लंडने भारतावर फॉलोऑन लादला. भारताने अखेरच्या दिवशी ८ बाद ३४४ धावा करत सामना अनिर्णीत राखला. यात स्नेह आणि तानिया भाटिया (नाबाद ४४) या दोघींनी ९ व्या गड्यासाठी नाबाद १०४ धावांची भागिदारी करत भारताचा पराभव टाळला.
हेही वाचा - महिला क्रिकेट विश्वात १७ वर्षीय शफालीचा खास विक्रम
हेही वाचा - WTC Final : ...तर सामना संपला समजा, वॉर्नची न्यूझीलंडला चेतावणी