लंडन - इंग्लंडने भारताविरुद्ध 12 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू मोईन अलीला संघात स्थान दिलं आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, मोईन अली मंगळवारी संघासोबत सराव करेल.
कर्णधार जो रुट वगळता इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज मागील काही काळापासून धावा जमवण्यात संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी संघाच्या सततच्या खराब कामगिरीमुळे संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 183 धावांवर ऑलआउट झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात जो रुटच्या 109 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडला 303 धावांपर्यंत मजल मारता आली.
सिल्वरवुड म्हणाले की, अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांच्या अनुपस्थितीत मोईन अलीला पाचारण करण्याचा विचार करण्यात येत आहे.
मोईनच्या नावाचा निश्चित विचार केला जात आहे. मी आणि जो रुट लॉर्ड्स कसोटीविषयी चर्चा करणार आहोत. आम्हाला कल्पना आहे की मोईन शानदार खेळाडू आहे. त्याने नुकतेत द हंड्रेड स्पर्धेत देखील चांगलं प्रदर्शन केलं आहे. तरीदेखील ही स्पर्धा वेगळी होती, असे देखील सिल्वरवुड म्हणाले.
दरम्यान, 32 वर्षीय मोईन अली चांगल्या लयीत आहे. त्याने द हंड्रेड स्पर्धेत बर्मिंघम फिनिक्सचे नेतृत्व करताना सोमवारी 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीने फिनिक्स संघ विजय झाला. त्याने आपला अखेरचा कसोटी सामना फेब्रुवारीमध्ये भारताविरुद्ध खेळला होता. तर मायदेशात त्याने आपल्या अखेरचा सामना 2019 मध्ये अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
हेही वाचा - नीरज चोप्राचा सन्मान; देशात दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येणार
हेही वाचा - BCCI ने NCA प्रमुख पदासाठी अर्ज मागवले, द्रविड पुन्हा अर्ज करण्याची शक्यता