लंडन : जसप्रीत बुमराह (19/6) आणि रोहित शर्मा (76) यांच्या बळावर भारताने आज मंगळवार (दि. 12 जुलै)रोजी ओव्हल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 188 चेंडू राखून इंग्लंडचा 10 विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला. भारत इंग्लंड सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. दरम्यान, संपूर्ण संघ 25.2 षटकांत 110 धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 18.4 षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने पहिल्यांदाच इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने जेसन रॉयला दुसऱ्याच षटकांत भोपळाही न फोडू देता तंबूत धाडले. त्यानंतर इंग्लंड संघाचे फलंदाज सातत्याने बाद होत राहिले.
इंग्लंडच्या फलंदाजांची उडाली भंबेरी -
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट, बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन देखील शून्यावर बाद झाले. त्यामुळे इंग्लंड संघाच्या फलंदाजीला खिंडार पडले. कर्णधार जोस बटलरने ( Captain Jos Buttler ) 32 चेंडूत 6 चौकार लगावत सर्वाधिक 30 धावांचे योगदान दिले. दरम्यान जॉनी बेयरस्टो (7), मोईन अली (14) आणि क्रेग ओव्हर्टन (8) धावांवर स्वस्तात परतल्याने इंग्लंडचा डाव अडचणीत आला. परंतु ब्रायडन कार्से संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना 26 चेंडूत 15 धावांची चिवट खेळी केली. तसेच डेव्हिड विलीने 21 धावा करताना एकाकी झुंज दिली
जसप्रीत बुमराहचा तिखट मारा -
भारतीय संघाकडून गोलंदाजीचा तिखट मारा करताना जसप्रीत बुमराहने ( Fast bowler Jaspreet Bumrah ) 7.2 षटकांत 19 धावा देताना सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याला शानदार साथ देतना मोहम्मद शमीने ( Fast bowler Mohammad Shami ) 7 षटकांत 31 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. तसेच प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट्स घेतली. अशा पद्धतीने इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला.
हेही वाचा - Sunil Gavaskar Statement : ज्येष्ठ खेळाडू आयपीएल खेळू शकतात तर देशासाठी का नाही सुनील गावस्करांचा सवाल