रांची (झारखंड) : ५ ऑक्टोबरला एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात झाली. भारतीय चाहत्यांना यंदा रोहित शर्मा आणि कंपनीकडून विजेतेपदाची अपेक्षा आहे. अनेक तज्ञ या स्पर्धेबद्दल भाकीत करत आहेत. महेंद्रसिंह धोनीचा बालपणीचा मित्र शब्बीर हुसैन यानंही या स्पर्धेसाठी आपला अंदाज व्यक्त केला.
धोनी प्रत्येक सामना खूप गांभीर्यानं घेतो : शब्बीर हुसेननं प्रथम धोनीच्या खेळाबद्दलच्या आवडीबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, भारताचा माजी कर्णधार राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय, प्रत्येक सामना त्याच उत्साहानं खेळतो. 'महेंद्रसिंह धोनीची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. असे अनेक क्रिकेटपटू आहेत जे भारताकडून खेळायला सुरुवात झाल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये लक्ष देत नाहीत, मात्र धोनी वेगळा होता. धोनी प्रत्येक सामना खूप गांभीर्यानं घ्यायचा. तो प्रत्येक सामना जिंकण्यासाठी खेळायचा. धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली, पण शस्त्रक्रियेपूर्वी त्यानं आयपीएलमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. हा जोश क्वचितच एखाद्या खेळाडूमध्ये पाहायला मिळतो. त्याची मानसिकता पूर्णपणे वेगळी आहे', असं हुसेननं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
टीम इंडिया फेवरेट : शब्बीर हा महेंद्रसिंह धोनीचा शालेय, क्लब आणि रणजी ट्रॉफीच्या दिवसांपासून सहकारी आहे. भारताच्या ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यतेवर तो म्हणाला की, भारत ही स्पर्धा जिंकण्यासाठी फेवरेट असेल. तसेच बीसीसीआय एमएस धोनीच्या अनुभवाचा उपयोग करू शकते, असंही त्यानं नमूद केलं. 'टीम इंडिया फेवरेट असेल. यावेळी संघ खूप संतुलित आहे. बीसीसीआय धोनीची मदत घेऊ शकते, कारण त्याला विश्वचषकात संघाला विजेतेपदापर्यंत नेण्याचा अनुभव आहे. सध्या 'मॅन ऑफ द सिरिज'चा अंदाज लावणं खूप कठीण आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडू फॉर्मात आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी असेल', असं शब्बीर म्हणाला.
शालेय क्रिकेटमध्ये धोनीचा विक्रम : यावेळी बोलताना शब्बीरनं शालेय क्रिकेटमधील धोनीबरोबरच्या त्याच्या विक्रमी भागीदारीबद्दल सांगितलं. धोनीच्या सलामीला येण्याच्या निर्णयामुळं हे शक्य झाल्याचं त्यानं सांगितलं. 'आम्ही के.व्ही. हिनूविरुद्ध एकदा अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर पुढील आवृत्तीतही आमची त्यांच्याशी लढत झाली. धोनीनं डावाची सुरुवात करताना आम्ही ३७६ धावांची भागीदारी केली. शालेय क्रिकेटमध्ये हा विक्रम अजूनही अबाधित आहे, असं त्यानं सांगितलं. झारखंडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा विचार करत असल्याचंही शब्बीरनं यावेळी सांगितलं. तसेच या कल्पनेबद्दल धोनीशीही चर्चा केल्याचं तो म्हणाला.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कप २०२३ पूर्वी पाकिस्तानचे फक्त २ खेळाडू भारतात आले होते, जाणून घ्या त्यांची नावं
- Cricket World Cup 2023 : लहानपणी अभ्यासाऐवजी केली क्रिकेटची निवड, आज विश्वचषक संघातील महत्वाचा खेळाडू आहे इशान किशन
- Cricket World Cup 2023 : पाचवेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार, जाणून घ्या संघाची ताकद आणि कमजोरी