बेंगळुरू : बेंगळुरूमधील प्रसिद्ध चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विश्वचषकाचे पाच सामने होणार आहेत. पहिला सामना २० ऑक्टोबर रोजी पाच वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होईल. त्यानंतर दुसरा सामना गतविजेता इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात २६ ऑक्टोबरला होणार आहे. ४ नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आणि ९ नोव्हेंबरला या मैदानावर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. १२ नोव्हेंबरला पाचव्या सामन्यात यजमान भारतासमोर नेदरलँडचं आव्हान असेल. विश्वचषक सामन्यांसाठी या हायप्रोफाईल स्टेडियममध्ये काही महत्त्वाच्या सुविधा वाढवण्यात आल्या आहेत.
'सब-एअर' यंत्रणा : ४०,००० आसनक्षमता असलेलं चिन्नास्वामी स्टेडियम हे देशातील पहिले स्टेडियम आहे ज्यामध्ये पावसामुळे प्रभावित परिस्थिती हाताळण्यासाठी 'सब-एअर' यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसंच विजेसाठी छतावर सौर पॅनेल आणि पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा आहे. विश्वचषक २०२३ साठी स्टेडियमची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकार्यांच्या टीमनं बेंगळुरूला भेट दिली आणि काही सूचना केल्या. त्यांच्या सूचनेनुसार स्टेडियमच्या काही स्टँडचे छत आणि जागा बदलण्यात आल्या असून माध्यमांसाठी राखीव असलेली खोली पूर्णपणे अपग्रेड करण्यात आली आहे.
- ड्रेसिंग रूम : खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्येही मोठे बदल करण्यात आले असून फरशा पूर्णपणे बदलण्यात आल्या आहेत. तसेच ड्रेसिंग रूममधील स्वच्छतागृहे अधिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आली आहेत.
- हॉस्पिटॅलिटी बॉक्स : स्टेडियममध्ये P-2, P, P-टेरेस आणि डायमंड असे चार बॉक्स आहेत. येथे चाहत्यांना जेवण आणि उच्च दर्जाच्या सुविधा अनुभवत सामना पाहता येईल. खेळाडूंच्या ड्रेसिंग रुमशेजारी असलेला डायमंड बॉक्स खास पाहुण्यांसाठी राखून ठेवण्यात आला आहे.
- खेळाडूंचा सराव : चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सरावासाठी पाच खेळपट्ट्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) मैदानाचाही सरावासाठी वापर केला जाणार आहे.
- खेळपट्टी : आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आयसीसीनं तीन खेळपट्ट्या निवडल्या आहेत. यापैकी, लाल मातीची खेळपट्टी सर्वात जास्त वापरली जाते. तसेच, चौथी खेळपट्टी स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आली आहे.
'सब-एअर' यंत्रणा : पावसामुळे सामने रद्द होऊ नयेत, यासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सर्वोत्तम 'सब-एअर' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रानं, पाऊस थांबल्यानंतर १५-२० मिनिटांनी आउटफिल्ड खेळासाठी तयार होईल. २०१७ मध्ये, अमेरिकेच्या 'सब एअर कंपनी'च्या सहकार्यानं ४.२५ कोटी रुपये खर्चून हे तंत्रज्ञान चिन्नास्वामीमध्ये स्थापित केलं गेलं. आयपीएल २०२३ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतरही या तंत्रज्ञानामुळे पूर्ण षटके खेळली गेली होती.
एंट्री गेट्स : चिन्नास्वामी स्टेडियमला २१ मुख्य गेट्स आहेत आणि कब्बन पार्कसमोरील मुख्य गेट खेळाडू आणि VIP साठी राखीव आहे. हे गेट इतर लोकांसाठी बंद राहील. इतर सर्व मुख्य दरवाजे सामना सुरू होण्याच्या तीन तास आधी उघडले जातील. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या मदतीसाठी कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि तिकीट एजन्सीचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पर्यावरण संरक्षण : पर्यावरण संरक्षणाचा एक भाग म्हणून, स्टेडियममध्ये आधीच वीजपुरवठा आणि पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी सौर पॅनेल आहेत. याशिवाय स्टेडियममध्ये वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी रिसायकलिंग मशीनही लावण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय आणि वाहतूक सहाय्य : कोणत्याही आपत्कालीन आणि वैद्यकीय आणीबाणीला सामोरं जाण्यासाठी सर्व सामन्यांच्या वेळी वैद्यकीय कर्मचारी आणि आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका स्टेडियमजवळ उपस्थित राहतील. सामन्याच्या दिवशी पहाटे एक वाजेपर्यंत मेट्रो रेल्वे सेवा उपलब्ध असेल.
हेही वाचा :