चेन्नई Cricket World Cup 2023 : आयसीसीच्या प्रत्येक मोठ्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलिया विजयाचा प्रबळ दावेदार असतो. या विश्वचषकातही पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हा संघ विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. रविवारी (८ ऑक्टोबरला) चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर भारताविरुद्धच्या सामन्यानं ऑस्ट्रेलिया आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. तत्पूर्वी बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं, रविवारी होणाऱ्या सलामीच्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंविरुद्ध खेळतानाचे अनुभव ऑस्ट्रेलियन संघासाठी उपयुक्त ठरतील, असं मत व्यक्त केलं.
भारताकडे अव्वल दर्जाचे तीन फिरकीपटू : भारतानं नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेत 'मेन इन ब्लू' ने २-१ असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेतून काही धडा घेऊन विश्वचषकात त्याची अंमलबजावणी करू शकतो. भारताकडे कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे तीन अव्वल दर्जाचे फिरकीपटू असल्यामुळे भारत या स्पर्धेत कडवं आव्हान उभं करू शकतो.
भारताविरुद्ध घरच्या परिस्थितीत खेळणं आव्हानात्मक : 'भारताकडे गोलंदाजांची चांगली फळी आहे. विशेषत: घरच्या परिस्थितीत त्यांच्याविरुद्ध खेळणं आव्हानात्मक असेल. चांगली गोष्ट म्हणजे, आम्ही त्यांच्याविरुद्ध बरंच खेळलो आहोत. त्यामुळे आमच्या फलंदाजांची स्वतःची योजना असेल. आम्हाला त्यांच्याविरुद्ध काही वेळा यशही मिळालं आहे. तसेच त्यांनी आमच्याविरुद्ध काही वेळा चांगली गोलंदाजीही केली आहे', असं पॅट कमिन्सनं सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारतीय मैदानांवर खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. कमिन्सला वाटतं की विश्वचषकात खेळताना हे खेळाडूंसाठी उपयुक्त ठरेल. 'या मैदानावर (एमए चिदंबरम) आम्ही अनेकदा खेळलो आहोत. जेव्हाही आम्ही भारताचा दौरा करतो तेव्हा इथे एक सामना होतो. आमचे काही खेळाडू चेन्नई सुपर किंग्ज साठीही खेळले आहेत. त्यामुळे हे आम्हाला फायद्याचं ठरू शकतं', असं कमिन्स म्हणाला.
ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा हुकुमी एक्का : राजकोट येथे नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय मालिकेतील तिसऱ्या वनडेत अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलनं ४० धावा देत चार विकेट घेतल्या. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. कमिन्सला आशा आहे की, आगामी वर्ल्डकपमध्ये देखील मॅक्सवेल बॅट आणि बॉलद्वारे महत्त्वाची भूमिका बजावेल. 'आम्ही मॅक्सीला पाहिलं आहे. तो एक आघाडीचा फिरकी गोलंदाज आहे. २०१५ च्या विश्वचषकात तो प्रत्येक सामन्यात आमचा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. भारताविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात तो खरोखरच चांगला खेळला. जर तो बॅटनं अपयशी ठरला, तर तो चेंडूसह योगदान देतो. त्याच्याकडे अप्रतिम कौशल्य आहे. आम्हाला त्याच्याकडून मोठ्या स्पर्धेत चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे', असं पॅट कमिन्सनं स्पष्ट केलं.