लंडन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 'द रोझ बाऊल' क्रिकेट मैदानावर रंगलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत विजयाने खाते उघडले. रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारताला विजयाचे लक्ष गाठता आले. त्याने १४४ चेंडुमध्ये १२२ धावा केल्या. तर, भारताकडून पहिलाच वनडे विश्वचषक खेळणारा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आफ्रिकेच्या संघाला खिंडार पाडले होते.
चहलने क्रिकेट खेळताना बुद्धीबळ या खेळाची फार मदत होते असे म्हटले आहे. तो पुढे म्हणाला, ‘तूम्ही जेव्हा बुद्धीबळ खेळता तेव्हा तूम्ही 15-16 चालींचा आधीच विचार करुन ठेवता. जेव्हा तुम्हाला फाफ सारख्या खेळाडूविरुद्ध गोलंदाजी करायची असते तेव्हा फलंदाज कोणता चेंडू खेळेल आणि खेळू शकणार नाही, याचा विचार करुन गुगली टाकायची की फ्लिपर टाकायचा हे ठरवण्याची गरज असते.’
या सामन्यामध्ये भारताकडून गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना फिरकीपटू युजवेंद्र चहलने सर्वाधिक ४ बळी मिळविले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, रस्सी वॅन डर दसेन, डेव्हिड मिलर आणि अँडील फेहलुक्वायो यांच्या विकेट्स चहलने घेतल्या होत्या.