नवी दिल्ली - फोर्ब्सने मंगळवारी जाहीर केलेल्या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने १०० वे स्थान पटकावले आहे. १०० जणांच्या या यादीमध्ये तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार विराटने मागील एका वर्षात २.५ कोटी डॉलर इतकी कमाई केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी जाहिरातींमधून २.१ कोटी डॉलर तर, वेतन आणि जिंकलेल्या मानधनातून ४० लाख इतकी कमाई त्याने केली आहे.
गेल्या वर्षी विराट फोर्ब्सच्या यादीमध्ये ८३ व्या स्थानी होता. यंदा त्याच्या स्थानात घसरण झाली आहे. असे असले तरी, जाहिरातींमधून येणारे उत्पन्न हे १० लाख डॉलरने वाढले आहे. स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेसी या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे.