टोकियो - तीनवेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन भारतीय संघाने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील ओई हॉकी स्टेडियम नॉर्थ पिच येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला हरवून भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात आगेकूच केली.
गुरजीत कौर निर्णायक गोल -
दुसऱ्या क्वार्टरमध्ये गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलमुळे राणी रामपालच्या नेतृत्वाखालील संघाला धार मिळाली होती. तोच गुरजीत कौर हिने केलेला एकमेव गोल भारतासाठी निर्णायक ठरला आहे.
४१ वर्षांनंतर प्रथमच -
पहिल्या क्वार्टरमध्ये कोणत्याही संघाने एकही गोल केला नव्हता, दुसऱ्या क्वार्टरमध्ये गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर एक गोल केला. यानंतर झालेल्या दोन्ही क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाला गोल करण्याची संधी भारताने दिली नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली केलेल्या बचावाने भारताने उपांत्य फेरीत आपली धडक दिली आहे. ४१ वर्षांनंतर भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये चमकदार केली आहे.