नवी दिल्ली - आयपीएलच्या आगामी हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होत आहे. तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सर्वात वयस्कर खेळाडू प्रविण तांबे आयपीएल खेळणार नसल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. केकेआरने १९ डिसेंबरला कोलकाता येथे पार पडलेल्या आयपीएल लिलावात प्रविण तांबेवर २० लाखांची बोली लावत संघात घेतले होते. तांबे यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य राहिला आहे.
हेही वाचा - टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाच्या निर्णयाने टेनिस जगतात खळबळ..
२०१८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर तांबेने शारजाहमध्ये टी-१० लीग खेळली होती. या व्यतिरिक्त त्याने काही परदेशी टी-२० लीग स्पर्धाही खेळल्या होत्या. या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे तांबेवर ही कारवाई करण्यात आली आहे. तांबेने काही कालावधीनंतर आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता.
आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबेविरूद्ध केलेल्या कारवाईची माहिती फ्रेंचायझी केकेआरला देण्यात आली आहे. प्रविण तांबेने मागील वर्षी अबुधाबी आणि शारजाह येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्याने या स्पर्धेत हॅट्ट्रिकही घेतली होती. इयॉन मॉर्गन, केरॉन पोलार्ड आणि फॅबियन एलेन या खेळाडूंना त्याने माघारी धाडले. होते. महत्वाची बाब म्हणजे, त्याने ख्रिस गेल आणि उपुल तरंगा यांनाही त्या सामन्यात बाद केले होते. तांबेने त्या सामन्यात २ षटकात १५ धावा देत ५ गडी बाद केले होते.