लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी बांगलादेशने ३३१ धावांचे आव्हान दिले होते. किंग्जस्टन ओव्हल, लंडन येथे रंगलेल्या रोमांचक सामन्यात बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर २१ धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यात ७५ धावा आणि १ गडी बाद घेतल्यामुळे शाकिब अल हसनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रथम फलंदाजीस उतरलेल्या बांगलादेश संघाने डावाची सुरुवात आक्रमकरित्या केली. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकारने ८.२ षटकात संघाला ६० धावांची सलामी दिली. सौम्या सरकारने३० चेंडूत ४२ धावांची खेळत संघाला आक्रमक सुरुवात करुन देण्यात महत्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शाकिब अल-हसनने ८४ चेंडूत ७५ धावांची खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. त्याला ताहिरने त्रिफळाचित करत माघारी धाडले. मुशफिकुर रहिम ७८ धावा आणि मोहम्मद मिथून २१ धावा काढून बाद झाल्यानंतर मेहमुदल्लाह ४६ धावा आणि मोसाद्देक हुसेनने २६ धावा करत संघाला ५० षटकांत ३३० धावांपर्यंत मजल मारुन दिली. आफ्रिकेकडून पेेहलुक्वायो, क्रिस मॉरिस आणि इम्रान ताहिरने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
बांगलादेशच्या ३३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने संथ सुरुवात केली. डी कॉक आणि मार्करम यांनी ४९ धावांची सलामी दिली. डी कॉकला धावबाद करत बांगलादेशने सलामी जोडी फोडली. यानंतर, कर्णधार फाफ डु प्लेसिसने चांगली फलंदाजी केली. डु प्लेसिस ६२ धावा काढून बाद झाला. डेव्हीड मिलरने संथ खेळी केली. मिलर ४३ चेंडूत ३८ धावा काढून बाद झाला. ड्युमिनीने ३७ चेंडूत ४५ धावांची खेळी करताना संघाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. परंतु, दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. आफ्रिकेचा संघ ५० षटकांत ८ बाद ३०९ धावाच काढू शकला. आफ्रिकेचा हा सलग दुसरा पराभव ठरला. विश्वकरंडकाच्या इतिहासात द.आफ्रिका प्रथमच पहिले २ सामने हरला आहे.
दक्षिण आफ्रिका संघ
क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्करम, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रस्सी वॅन डर डुस्सेन, जीन-पॉल डुमिनी, डेव्हीड मिलर, अॅन्डाईल पेहलुक्वायो, क्रिस मॉरिस, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, इम्रान ताहिर.
बांगलादेश संघ
तमिम इक्बाल, सौम्या सरकार, शाकिब अल-हसन, मुशफिकुर रहिम (यष्टीरक्षक), मोहम्मद मिथुन, मेहमुदल्लाह, मोसाद्देक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन, मशर्फे मोर्तझा (कर्णधार), मुस्ताफिजुर रेहमान.