लंडन - विश्वकरंडकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दिग्गज संघ ऐकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघ हे या विश्वकंरडकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे आजची लढत रंगतदार होणार आहे. विश्वकरंडकात पहिल्या सामन्यापासून विक्रम पाहायला मिळाले. आजच्या सामन्यातही भारताचा सलामीवीर रोहित शर्माला एक विक्रम करण्याची संधी मिळणार आहे.
आज होणाऱ्या सामन्यात रोहितने 20 धावा काढल्यास तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात वेगाने दोन हजार धावा फटकावणारा फलंदाज ठरणार आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा फटकावणाऱ्या सचिन तेंडुलकर, व्हीव रिचर्डस आणि डेसमंड हेन्स या फलंदाजांच्या पंक्तीत रोहितला बसता येईल.
आतापर्यंत रोहित शर्माने केवळ 37 डावांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1980 धावा फटकावल्या आहेत. तर व्हीव रिचर्ड्स यांनी 45, सचिन तेंडुलकरने 51 आणि डेसमंड हेन्स यांनी 59 डावांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत नाबाद 122 धावांची खेळी केली होती. त्यामुळे आजच्या लढतीमध्ये रोहितकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे.