लीड्स - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या शतकी खेळीने श्रीलंकेचा 7 गडी राखून विजय मिळवला. सलामीवीर रोहित शर्माने शतकाचा धडाचा सुरुच ठेवला आहे. श्रीलंकेविरुध्दच्या शतकासह रोहितने या स्पर्धेत 5 शतके ठोकली आहेत. आणि आता तो अजून एका मोठ्या विश्वविक्रमाच्या जवळ येऊन पोहोचला आहे.
विश्वकरंडक स्पर्धेत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने २००३ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ६७३ धावा करून विक्रम रचला होता. आणि आता रोहित या विक्रमाला मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहितच्या या स्पर्धेत ६४७ धावा झाल्या आहेत. आणि सचिनचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला अवघ्या २६ धावांची गरज आहे. त्यामुळे हा विश्वविक्रम तो रचतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराने 2015 च्या विश्वकरंडक स्पर्धेत 4 शतके लगावली होती. हा एक विश्वविक्रम होता. तेव्हा रोहित शर्माने बांगलादेशविरुध्द्च्या सामन्यात शतक लगावत संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. 'रन मशिन' रोहितने लंकेच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत शतक ठोकत विश्वविक्रम केला. हा पराक्रम करणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू बनला आहे. रोहित शर्मा याने विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका, अशा 5 संघाविरुद्ध शतकी खेळी केली आहे.