लंडन - सध्या चालू असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला दुखापतींचे ग्रहण तर लागलेच आहे. शिवाय, आणखी एका गोष्टीमुळे विश्वकरंडक स्पर्धा चर्चेत आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सतत पावसाचा व्यत्यय येत आहे. काल होणारा बांगलादेशविरुद्ध श्रीलंका हा सामनादेखील नाणेफेक न होताच पावसामुळे रद्द झाला.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत, असे पहिल्यांदाच झाले आहे की, एकापेक्षा अधिक सामने एकही चेंडू न खेळता पावसामुळे वाया गेले आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्यात केवळ 7.3 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामना पूर्ण होऊ शकला नव्हता.
इतिहास पाहायचा झाला तर, मागील 11 विश्वकरंडक स्पर्धांमध्ये फक्त 1979 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंका संघातील सामना तर 2015 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेश संघातील सामना पावसामुळे एकही चेंडूचा खेळ न होता रद्द झाला होता. सध्या चालू असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उरलेल्या सामन्यांतही पावसाचे सावट आहे.