नॉटिंगहॅम - विश्वकरंड क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलीया आणि वेस्टइंडीज यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १५ धावांनी पराभव केला. या सामन्यात स्टीव स्मिथ, अॅलेक्स कॅरी आणि नथन कुल्टर-नाइल या तिघांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार देत कांगारुंना आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलियाच्या २८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने दमदार खेळ केला. मात्र, शेवटच्या १० षटकांत वेस्ट इंडिजने योग्य खेळ न केल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. डावखुऱ्या मिचेल स्टार्कने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला विजय साकारता आला.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा प्रमुख असलेल्या मिचेल स्टार्कने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. या सामन्यात स्टार्कने ५ विकेट तर घेतल्याच. शिवाय, एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सर्वात जलद १५० बळी घेण्याचा पराक्रमही त्याने केला आहे. हा विक्रम करताना त्याने फक्त ७७ सामने खळले आहेत.
पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकने याआधी ७८ सामने खेळताना १५० बळी घेण्याची किमया केली होती. पण आता हा विक्रम स्टार्कने मोडील काढला आहे.