कोलकाता - विश्वकरंडक स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात होते आहे. या पार्श्वभूमीवर अनेक क्रिकेटपंडितांनी आपले अंदाज मांडायला सुरुवात केली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रानेही असाच एक दावा केला आहे.
मॅकग्राच्या मते, विश्वकप स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ हा त्याचा फेव्हरिट संघ आहे. तो कोणत्याही संघाला हरवू शकतो. पण एरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये येऊ शकतो असेही तो म्हणाला.
त्याने पुढे म्हटले की, "सध्याचा फॉर्म बघता इंग्लंडच्या संघाने जे प्रदर्शन केले आहे, ते पाहून मी प्रभावित झालो आहे. बहुतेक संघ हे मधल्या षटकांमध्ये मंद गतीने खेळतात पण इंग्लंड आणि भारत हे असे संघ आहेत जे संपूर्ण ५० षटकांत जलदगतीने धावा बनवू शकतात. हा सर्व टी-२० क्रिकेटचा परिणाम आहे".
मॅकग्राने अन्य संघांविषयीसुद्धा टिप्पणी केली. तो म्हणाला, "दक्षिण आफ्रिका हा नेहमीच चांगला संघ राहिला आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा संघ छुपा रुस्तम आहे. इंग्लंड आणि भारताला हरवणे कठिण आहे".