साऊदम्पटन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची सुरुवात ३० मेपासून सुरुवात झाली असली तरी साऱ्या जगाचे लक्ष आज होणाऱ्या सामन्याकडे असणार आहे. कारण आज भारतीय संघ आपला सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेशी खेळणार आहे. हा सामना साउथॅप्टनच्या रोज बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता ही लढत होणार आहे.
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा या विश्वचषकातील हा पहिलाच सामना असणार आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत ५-१ असे हरवण्याची किमया भारतीय संघाने केली होती. सध्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी असून त्याखालोखाल दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकातील हा तिसरा सामना असून पहिल्या २ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालाय. तसेच दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन जखमी झाल्याने तो पूर्ण विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ संकटात सापडला आहे.
सामन्यातील प्रमुख आकर्षण -
विराट कोहली -
या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला सरावादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे भारताच्या सलामीच्या सामन्या विराट खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र, विराट हा पूर्णपणे फिट असून तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.
इमरान ताहिर-
इमरान ताहिरने यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची सुरुवात एकदम दणक्यात केली आहे. आजच्या सामन्यात तो कसे प्रदर्शन करतो याकेडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ताहिर या स्पर्धेनतंर एकदिवसीय क्रिकेटमधून तो निवृत्त होणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून इमरान ताहिरने २४ फेब्रुवारी २०११ साली एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. ताहिरने दक्षिण आफ्रिकेकडून ९५ एकदिवसीय सामने खेळताना १५६ गडी बाद केले आहेत. फेब्रुवारी २०१७ साली ३७ वर्षाचा असलेल्या इमरान ताहिरने आयसीसीच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी क्रमवारीत अव्वलस्थान गाठले होते.
विश्वचषक स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ
- भारत - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
- दक्षिण आफ्रिका - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अॅडेन मार्करम, क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), हाशिम अमला, रॅसी वॅन डर ड्यूसेन, डेविड मिलर, एंडिले फेलुकवायो, जेपी ड्यूमिनी, ड्वेन प्रिस्टोरियस, ब्युरोन हॅन्ड्रिक्स, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, ख्रिस मॉरिस, इमरान ताहिर, तब्रिज शम्सी.