लीड्स - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या शतकी खेळीने श्रीलंकेचा 7 गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेने भारताला 265 धावांचे आव्हान दिले होते. ते आव्हान भारताने 43.3 षटकात पूर्ण केले. भारताच्या सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी ताबडतोड फलंदाजी करत शतके लगावली. रोहितने 94 चेंडूत 103 धावांची खेळी केली तर लोकेश राहुलने 118 चेंडूत 111 धावा केल्या.
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने शतकाचा धडाचा सुरुच ठेवला आहे. त्याने आज श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यातही शतकी खेळी केली. या शतकासह रोहितने या स्पर्धेत 5 शतके ठोकली आहेत. आज रोहित शर्माने 94 चेंडूत 103 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकार लगावले. तो बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने संयमी 111 धावांची खेळी केली. त्याला कर्णधार कोहलीने साथ दिली. राहुलने आपल्या खेळीत 11 चौकार एक षटकार लगावला.
राहुल बाद झाल्यानंतर पंतही लगेचच बाद झाला. त्यानंतर कोहली आणि पांड्याने भारताला विजय मिळवून दिली. सामन्यात 103 धावा करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर घोषीत करण्यात आले. रोहित शर्माने एका विश्वकरंडक स्पर्धेत सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय श्रीलंकेला महागात पडला. कर्णधार करुणारत्ने आणि कुशल परेरा यांची सलामीची जोडी सपशेल अपयशी ठरली. संघाच्या 55 धावा फलकावर लागल्या असताना लंकेने 4 गडी गमावले होते. लंकेचा डाव लवकर आटोपणार असे वाटत असताना मॅथ्यूज- थिरीमाने जोडीने 124 धावांची भागीदारी रचली. थिरीमानेने 53 धावांची उपयुक्त खेळी केली. धंनंजय डी सिल्वाने शेवटी येऊन 29 धावांची खेळी केली. अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या जोरावर श्रींलेकेने भारताला 265 धावांचे आव्हान दिले होते. मॅथ्यूजने 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 113 धावा फटकावल्या. मधल्या फळीतील फलंदाज लाहिरू थिरीमानेला सोबत घेत मॅथ्यूजने लंकेच्या डावाला आकार दिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.