जयपूर - भारताचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या नव्या इनिंगची विजयी सुरुवात केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 5 गडी राखून पराभूत केले. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 164 धावा करून भारतासमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी दमदार अर्धशतके ठोकली. प्रत्युत्तरात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले तर, रोहितने ४८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्माचं 2 धावांनी अर्धशतक हुकलं. मिचेल सॅंटनरच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद झाला. शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी एक-एक चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 165 धावांचे आवाहन उभे केले होते. याचा पाठलाग करताना भारताने 5 विकेट राखून न्यूझीलंडचा पराभव केला. सलामीवीर केएल राहुल 15 धावांवर असताना झेलबाद झाला. यावेळी भारताची धावसंख्या 5.1 षटकात 50 धावा होती. राहुल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने कर्णधार रोहित शर्माला चांगली साथ देत शानदार खेळी केली.
भारताने 11.3 षटकांत आपले शतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादवने फिरकी गोलंदाज टॉड अॅस्टलच्या चेंडूवर षटकार आणि चौकार ठोकत संघाला 100 धावांपर्यंत नेले. मात्र, यानंतर मोठा फटका खेळताना कर्णधार रोहित शर्माने आपली विकेट गमावली. त्याने 48 धावांची खेळी केली.
दरम्यान, भारताला शेवटच्या षटकात 10 धावांची गरज होती. शेवटच्या षटकात आलेल्या टॉड अॅस्टलने या षटकाची सुरुवात वाईड बॉलने केली. भारताला आता 6 चेंडूत विजयासाठी 9 धावांची गरज होती. वेंकटेशने टॉडच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीची सुरुवात केली पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी भारताची धावसंख्या 5 बाद 160 धावांवर होती. भारताला चार चेंडूत ५ धावा हव्या होत्या. अक्षर पटेल पुढचा फलंदाज होता. पण टॉडच्या आणखी एका वाईडने चेंडू आणि धावांमधील फरक बरोबरीत आणला. पटेलने एक धाव घेत ऋषभ पंतकडे जबाबदारी सोपवली आणि त्याने टॉडच्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. भारताने न्यूझीलंडवर ५ विकेट्सने मात केली.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व न्यूझीलंडला फलंदाजीस पाचारण केले. मार्टीन गप्टील व डॅरिल मिशेलने न्यूझीलंच्या डावाच्या सुरुवात केली. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर डॅरिल मिशेलची शून्यावर दांडी गुल करत न्यूझीलंडला पहिलाच धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी संघाला सावरले. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी १०९ धावांची भागीदारी केली. हे दोघे संघाला मोठी धावसंख्या गाठून देणार असे वाटत असताना रोहितने अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. अश्विनने एकाच षटकात चॅपमन आणि त्यानंतर आलेल्या ग्लेन फिलिप्सला शुन्यावर तंबूत धाडून न्यूझीलंच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. चॅपमनने ६ चौकार आणि २ षटकारांसह 50 चेंडूत ६३ धावा केल्या.
दुसऱ्या बाजूने गप्टिलने आक्रमक फलंदाजी केली. संघाच्या दीडशे धावा फलकावर लावल्यानंतर वेगवान गोलंदाज दीपर चहरने गप्टिलला माघारी पाठवले. गप्टिलने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ७० धावा केल्या. गप्टिलनंतर न्यूझीलंडचे इतर फलंदाज ढेपाळले. भारताने शेवटच्या चार षटकात भेदक मारा केला. एकवेळी न्यूझीलंडची धावसंख्या 180-190 पर्यंत पोहचेल असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत किवी फलंदाजांना जखडून टाकले. न्यूझीलंडला २० षटकात ६ बाद १६४ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून भुवनेश्वर आणि अश्विनने प्रत्येकी २ बळी घेतले.
हेही वाचा - Sharad Pawar Vidarbha Visit : अनिल देशमुखांच्या कोठडीची किंमत मोजावी लागेल - शरद पवार