साऊदम्पटन - भारत आणि अफगाणिस्तानच्या संघात आज पहिल्यांदाच विश्वचषकात सामना होणार आहे. अफगाणिस्तान संघाने आत्तापर्यंत पाच सामने खेळले असून या पाचही सामन्यात अफगाणिस्तान संघाला पराभवाची चव चाखावी लागली. दुसरीकडे भारतीय संघ प्रचंड लयीत आहे. त्यामुळे आज भारतीय संघ अफगाणिस्तानच्या संघाला लोळवण्यास सज्ज झाला आहे. हा सामना साऊदम्पटनच्या द रोज बाऊल मैदानावर दुपारी ३ वाजता खेळण्यात येणार आहे.
भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. मात्र तरीही भारताचे आघाडीचे फलंदाज धावांचा डोंगर उभारण्यास उत्सुक आहेत. भारताने बलाढ्य दक्षिण ऑफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघाचा पराभव केला आहे. तर न्युझीलंडसोबतचा सामना पाण्यात वाहून गेला आहे. दुसरीकडे अफगाणीस्तान संघाची विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान गुणतालिकेत शेवटच्या म्हणजे १० व्या स्थानी आहे. तर विश्वकरंडकात आतापर्यंत अपराजित राहिलेला भारतीय संघ ७ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
या सामन्यात भारताची मुख्य मदार ही कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनी, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असेल. तर अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी, रशीद खान आणि मुजीब उर रहमान यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
असे आहेत दोन्ही संघ -
- भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत.
- अफगाणिस्तान - गुलाबदीन नैब (कर्णधार), मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), नूर अली झादरान, हझरतुल्ला झाझाई, रहमत शाह, असगर अफगाण, हशमतुल्ला शाहिदी, नजीबुल्ला झादरान, समीउल्ला शिनवारी, मोहम्मद नबी, रशीद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हमीद हसन, मुजीब उर रहमान.