लंडन - ज्या खेळाडूमुळे न्यूझीलंड संघाचे यंदाचा विश्वकरंडक उंचावण्याचे स्वप्न भंगले त्या अष्टपैलू बेन स्टोक्सला ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चे नामांकन मिळाले आहे. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात 84 धावांची झुंजार खेळी साकारत इंग्लंडला पहिला-वहिला विश्वकरंडक मिळवून दिला आहे.
स्टोक्ससोबत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनलाही ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चे नामांकन मिळाले आहे. विल्यमसनलाही यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे. न्यूझीलंडच्या असलेल्या व्यक्तीने एखादे मोठे कार्य केले तर त्याची दखल घेत हा सन्मान दिला जातो. न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. ऑस्ट्रेलियाच्या जेफरी जॉन हॉप यांनी 2010 मध्ये हा पुरस्कार सुरू केला होता. 28 वर्षीय बेन स्टोक्स हा मूळचा न्यूझीलंडचा आहे. त्याचे वडील अँड्रय़ू स्टोक्स यांची इंग्लंडच्या वोकिंग टाऊन रग्बी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर स्टोक्स कुटुंबीय इंग्लंडला स्थायिक झाले. स्टोक्सने 2011 मध्ये इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
या पुरस्काराशिवाय, स्टोक्सने केलेल्या प्रदर्शनामुळे त्याला 'सर' ही उपाधी देण्यात येऊ शकते. इंग्लंड देशाच्या पंतप्रधानपदाचे दावेदार बोरिस जॉन्सन आणि जेरेमी हंट स्टोक्सच्या प्रदर्शनावर जाम खुश आहेत. त्यांना एका मुलाखतीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. याचे उत्तर होय किंवा नाही यामध्ये देण्यास सांगितले. या कार्यक्रमात जॉन्सन यांना स्टोक्स नाईटहुड होऊ शकतो का असे विचारले असता. त्यावर जॉन्सन यांनी होय असे उत्तर दिले. हा प्रश्न हंट यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनीही होय असे उत्तर दिले. त्यामुळे आगामी काळात बेन स्टोक्सला 'सर' या उपाधीने सन्मानित करता येऊ शकते.