ब्रिस्टॉल - गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ आज विश्वकरंडक स्पर्धेमध्ये ब्रिस्टॉलच्या काऊंटी मैदानावर पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघासंमोर नवख्या अफगाणिस्तानचा सोपा पेपर असणार आहे. चेंडू फेरफार प्रकरणात अडकलेल्या स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रलियाचा संघ अधिक बळकट झाला आहे. आजचा सामना सायंकाळी ६ वाजता सुरु होईल.
ऍरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, शॉन मार्श, उस्मान ख्वाजा असे दमदार फलंदाज आहेत. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जेसन बेहरेनडॉर्फ, नाथन कॉल्टर नाईल व केन रिचर्डसन, ऍडम झम्पा, नाथन लॉयन असा गोलंदाजांचा ताफा ऑस्ट्रेलियाकडे आहे.
दुसरीकडे अफगाणिस्तानने पाकिस्तानला सराव सामन्यात धूळ चारत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. सध्याच्या घडीला अफगाणिस्तानचा क्रिकेटप्रवास रंजकच ठरला आहे. विश्वचषकासाठी गुलबदिन नैबकडे कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे.
- सामन्यातील प्रमुख आकर्षण
स्टीव स्मिथ -
विश्वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात स्टीव स्मिथने दमदार शतक केले होते. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात स्मिथने १०२ चेंडूत ११६ धावा करत शानदार शतकी खेळी केली. त्याच्या या शानदार खेळीत ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
राशिद खान -
राशिद खानची जादूई फिरकी अजुन भल्याभल्यांना कळलेली नाही. सामन्याचे चित्र पालटू शकणारा राशिद अफगाणिस्तानचा प्रमुख खेळाडू मानला जातो.
ऑस्ट्रेलियाचा संघ -
- अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा.
अफगाणिस्तानचा संघ -
- गुलाबदीन नाईब (कर्णधार), मोहम्मद शहजाद, नूर अली झादरान, हजरतुल्लाह जजाई, रहमत शाह, असघर अफगाण, हशमतुल्लाह शाहीदी, नजीबुल्लाह झादरान, समिउल्लाह शिनवारी, मोहम्मद नबी, राशिद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान.