हरारे - झिम्बाब्वे सरकारने पुरुषांचा क्रिकेट संघ पाकिस्तानात पाठवण्यासाठी देशाच्या क्रिकेट बोर्डाला मान्यता दिली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झिम्बाब्वे पाकिस्तान दौर्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे.
“झिम्बाब्वे सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झिम्बाब्वे क्रिकेटला पाकिस्तान दौरा देण्यास मान्यता दिली आहे'', असे झिम्बाब्वे क्रिकेटने आपल्या ट्विटरवर म्हटले.
एका अहवालानुसार झिम्बाब्वेला पाकिस्तान दौर्यावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिका वर्ल्ड कप सुपर लीगचा एक भाग असून हे सामने मुलतानमध्ये ३० ऑक्टोबर, १ आणि ३ नोव्हेंबरला खेळवण्यात येतील.
या मालिकेनंतर, झिम्बाब्वेचा संघ ७, ८ आणि १० नोव्हेंबरला रावळपिंडीमध्ये टी-२० सामने खेळणार आहे. गेल्या पाच वर्षांत झिम्बाब्वेचा हा दुसरा पाकिस्तान दौरा असेल.