कॅनबेरा - पदार्पणवीर टी. नटराजन आणि युझवेंद्र चहल यांनी केलेल्या दमदार गोलंदाजीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय नोंदवला. रवींद्र जडेजाचा 'कन्कशन सबस्टिट्युट' म्हणजेच बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या चहलने ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेडला बाद करत यजमान संघाच्या डावाला खिंडार पाडले. २० षटकात ऑस्ट्रेलियाचा संघ ७ बाद १५० धावा करू शकला. चहलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा - फिरकीपटू मुजीब-उर-रहमानला कोरोना
मात्र, चहलच्या संघातील समावेशाबद्दल वाद निर्माण झाले आहेत. टीम इंडियाने चहलला संघात घेऊन रडीचा डाव खेळला का?, असा सवालही उपस्थित होत आहे. इतकेत नव्हे, जेव्हा चहलचा समावेश करण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरनेही आक्षेप घेतला.
फलंदाजीदरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या हेल्मेटला चेंडू लागल्यामुळे तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. भारताने कन्कशन सबस्टिट्युट नियमाअंतर्गत युझवेंद्र चहलला खेळवण्याची परवानगी मागितली. सामनाधिकारी डेव्डीड बून यांनीही ही परवानगी मान्य करत चहलला खेळण्याची संधी दिली.
आयसीसीचा नवा नियम -
क्रिकेटपटूला सामन्यादरम्यान डोक्यावर मार लागला असेल तर सामनाधिकारी त्या संघाची बदली खेळाडूची विनंती मान्य करु शकतात. पण त्या खेळाडूचा समावेश केल्यामुळे संघाला अतिरिक्त फायदा होणार नाही याची काळजी घेऊनच सामनाधिकारी हा निर्णय घेऊ शकतात.