शारजाह - महिला टी-२० क्रिकेट चॅलेंजर्स स्पर्धेचा आज अंतिम सामना सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात होणार आहे. सुपरनोव्हाज सलग तिसरे जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. तर ट्रेलब्लेझर्स पहिल्या जेतेपदासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यात सुपरनोव्हाज संघाचे पारडे वरचढ मानले जात आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाज संघ फॉर्मात आहे. कारण शनिवारी अखेरच्या लीग सामन्यात त्यांनी स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्सचा पराभव केला आहे. तसेच ते २०१८ व २०१९ चे चॅम्पियन आहेत.
सुपरनोव्हाजची बलस्थाने...
सुपरनोव्हाजची खेळाडू चामरी अटापट्टू हिने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या या अनुभवी खेळाडूने यंदाच्या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. ट्रेलब्लेझर्सविरुद्ध साखळी सामन्यात तिने ४८ चेंडूंमध्ये ६७ धावांची खेळी करत स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावले होते. कर्णधार हरमनप्रीतने दोन्ही सामन्यात प्रत्येकी ३१ धावांची खेळी केली.
कर्णधार स्मृतीकडून आपेक्षा...
दुसरीकडे ट्रेलब्लेझर्सने स्पर्धेत शानदार सुरुवात केली. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन व अनुभवी झुलन गोस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी वेलोसिटी संघाचा केवळ ४७ धावात खुर्दा उडवत सहज विजय नोंदवला. पण कर्णधार स्मृती दोन सामन्यात केवळ ३९ धावा करू शकली. तिची सलामीवीर फलंदाज डिएंड्रा डोटिन फॉर्मात आहे.
हेही वाचा - जोफ्रा आर्चरने केली होती बायडेन यांच्या विजयाची भविष्यवाणी!
हेही वाचा - हैदराबादला नमवून दिल्लीची प्रथमच फायनलमध्ये धडक, आता गाठ मुंबईशी