नवी दिल्ली - भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनसोबतची एक आठवण शेअर केली आहे. हेडन बाद झाल्यानंतर मी त्याची चेष्टा केली, तेव्हा तो खूप रागावला होता, असे पार्थिव म्हणाला.
ऑस्ट्रेलियन संघ 2004 मध्ये ब्रिस्बेन येथे भारताविरुद्ध 304 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. सलामीवीर हेडनने त्या सामन्यात 109 धावा करत शानदार शतक झळकावले होते. यानंतर इरफान पठाणच्या चेंडूवर तो बाद झाला. हेडनची विकेट भारतासाठी अत्यंत मोलाची ठरली आणि भारताने 19 धावांनी हा सामना जिंकला. सामना गमावल्यानंतर हेडन मस्करीच्या मूडमध्ये नव्हता.
एका कार्यक्रमात पार्थिवने ही गोष्ट सांगितली. सामन्यात त्याला इरफान पठाणने बाद केले आणि मी ड्रिंक्स घेऊन जात होतो. त्याने आधीच शतक ठोकले होते आणि इरफानने त्याला बाद करत सामना फिरवला होता. मी त्याच्या जवळून जाताना त्याला 'हू हू' केले. तो खूप रागावला होता आणि ब्रिस्बेनमधील ड्रेसिंग रूमच्या बाहेर उभा होता. त्याने मला सांगितले, की मी पुन्हा असे केले तर तो मला तोंडावर ठोसा मारेल. मी त्याची माफी मागितली. पण तो न बोलताच निघून गेला.
पार्थिव पुढे म्हणाला, ''आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना तो नंतर चांगला मित्र झाला. ब्रिस्बेनमध्ये मला मारण्याची त्याची इच्छा होती, पण नंतर आम्ही चांगले मित्र झालो. चेन्नईसाठी आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो आहे. आयपीएल संपल्यानंतरही मी ऑस्ट्रेलियाला गेलो. हेडनने मला घरी बोलावले आणि माझ्यासाठी चिकन आणि मसूर बनवले."