मँचेस्टर - इंग्लंडमध्ये लीग क्रिकेट खेळत असताना आपल्यालाही वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला असल्याचे वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी म्हटले आहे. सिमन्स यांनी 80 आणि 90 च्या दशकात इंग्लंडमधील अनेक लीगमध्ये भाग घेतला होता. 1996 काऊंटी चॅम्पियनशिप जिंकणार्या लिसेस्टरचे ते प्रमुख सदस्य होते.
''मलाही लीगमध्ये वर्णद्वेषाचा सामना करावा लागला आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये मला याचा तितका सामना करावा लागला नाही. पण लीग क्रिकेटमध्ये मला अशी वागणूक मिळाली. ही चांगली गोष्ट नाही. याचा माझ्या बायकोवर परिणाम झाला. ही मुळीच चांगली गोष्ट नाही. मी तीन-चार वेगवेगळ्या लीगमध्ये खेळलो आहे'', असे सिमन्स यांनी म्हटले.
इंग्लंडबरोबरच्या कसोटी मालिकेत 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' चळवळीला नक्कीच पाठिंबा दर्शवणार असल्याचे सिमन्स यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "आम्ही या आंदोलनाला पाठिंबा कसा दर्शवू शकतो याबद्दल निश्चितपणे विचार करत आहोत."
इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका 8 जुलैपासून सुरू होईल.