दुबई - आयपीएलचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याआधीच दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाॉन्टिंगने मुंबईच्या संघाला इशारा दिला आहे. दिल्लीच्या संघाला कमी लेखू नये, दिल्लीची सर्वोत्तम कामगिरी अद्याप शिल्लक आहे, असे पाॉन्टिंगने म्हटलं आहे.
पाॉन्टिंग म्हणाला, 'दिल्ली संघाच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत. आम्ही येथे आयपीएलची स्पर्धा जिंकण्यासाठी आलो आहोत. अंतिम सामन्यामध्ये आम्ही सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवू.'
पहिल्यांदाच
दिल्लीने तेराव्या हंगामाची सुरुवात धडाक्यात केली. पण त्यांची गाडी अखेरच्या काही सामन्यांमध्ये रुळांवरून घसरली. क्वालिफायर सामन्यात दिल्लीने चांगले पुनरागमन केले. त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत पहिल्यादांच अंतिम फेरीत धडक दिली. या कामगिरीनंतर आजच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करू, अशी अपेक्षा पाॉन्टिंगने व्यक्त केली आहे.
किती हरलो, किती जिंकलो महत्त्वाचे नाही...
अंतिम फेरीपर्यंत येताना आम्ही किती सामने जिंकलो, किती हारलो हे आता फारसे महत्वाचे नाही. प्रत्येक संघ काही सामने जिंकतो काही सामने हारतो. मात्र आम्ही इथेपर्यंत पोहचलो हे महत्वाचे आहे. आमच्या संघाचा सर्वोत्तम खेळ अजून शिल्लक आहे, असे मला वाटतंय. त्यामुळे या सामन्यात चांगली कामगिरी करू, असा विश्वास पाँटिंगने व्यक्त केला आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात तीन सामने झाले आहेत. यात तिन्ही सामन्यांत मुंबईने विजय मिळवला आहे. यामुळे अंतिम सामन्यात मुंबईवर विजय मिळवण्यासाठी दिल्लीला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
हेही वाचा - IPL २०२० : 'आम्ही जिंकणार', रोहितने व्यक्त केला विश्वास
हेही वाचा - IPL २०२० MI vs DC Final : दिल्लीची 'दिवाळी' की मुंबई मारणार 'पंच'