मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात, हिटमॅन रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. भारतीय संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहलीचा हा निर्णय भारताचा माजी सलामीवर फलंदाज विरेंद्र सेहवागला पटलेला नाही. त्याने कर्णधार कोहलीला याविषयावरून चांगलेच सुनावले आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला आणि ५ सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय कर्णधाराने धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला विश्रांती देत त्याच्या जागी शिखर धवनला सलामीला पाठवले. धवन या सामन्यात अपयशी ठरला. या सामन्यात त्याला १२ चेंडूत केवळ ४ धावा करता आल्या. याविषयावरून सेहवागने विराटच्या निर्णयावर टीका केली आहे.
सेहवाग एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना म्हणाला, 'विराटनं सांगितलं की रोहित शर्मा पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये खेळणार नाही. पण जर भारत हरला तर ही रणनीती कायम राहील का? पराभवामुळे संघावर खूप फरक पडतो.'
मी कर्णधार असतो तर मी माझा सर्वोत्कृष्ट संघ मैदानात उतरवला असता. रोहित शर्मा उपलब्ध असल्यास मी त्याला मैदानात उतरवणारच. प्रेक्षक रोहित सारख्या खेळाडूंना पाहण्यासाठी येतात. मी स्वतः त्याचा चाहता आहे. जर तो खेळला नाही तर माझा टीव्ही बंद राहिल, असे देखील सेहवाग म्हणाला.
दरम्यान, रोहित शर्मा उपलब्ध असूनही त्याला संघाबाहेर ठेवण्याचा कर्णधार कोहलीचा निर्णय, त्याच्या चांगलाच अंगाशी आला आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक, क्रिकेट समीक्षक विराट कोहलीवर टीकेचा भडीमार करत आहेत.
इंग्लंडची मालिकेत आघाडी -
पहिल्या टी-२० भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ठेवलेले ७ बाद १२४ धावांचे माफक लक्ष्य पाहुण्या संघाने सहज पार केले. जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी ८ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. जेसन रॉयनं ३२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. डेवीड मलान २४, तर जॉनी बेअरस्टो २६ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडने ८ विकेट्स व २७ चेंडू राखून हा सामना जिंकला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
हेही वाचा - IPL २०२१ : पंजाब किंग्जची जय्यत तयारी, 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूला केलं प्रशिक्षक
हेही वाचा - बुमराह पेक्षा 'इतक्या' वर्षांनी मोठी आहे त्याची होणारी पत्नी