मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी मिनी लिलाव चेन्नईत पार पडला. यात युवा खेळाडूंवर लाखोंची बोली लागली. केरळचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन त्यापैकी एक. अझरुद्दीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याच्या मूळ किंमत २० लाखांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात घेतले. बंगळुरूने अझरुद्दीनची निवड केल्यानंतर विराट कोहलीने अझरुद्दीनला मॅसेज केला. ज्यामध्ये विराटने अझरुद्दीनचे बंगळुरू संघामध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
अझरुद्दीनने एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना सांगितलं की, 'लिलावानंतर दोन मिनिटांनी मला विराट भाऊचा मॅसेज आला. त्यामध्ये लिहलं होतं, वेलकम टू आरसीबी, ऑल द बेस्ट. विराटचा हा मेसेज पाहून मी भावुक झालो होतो. विराट मला मॅसेज करेल असा मी कधीही विचार केला नव्हता. विराट माझा आयकॉन आहे. त्याच्यासोबत क्रिकेट खेळण्याचे माझे स्वप्न आहे. विराटच्या संघाचा सदस्य झाल्यामुळे मी खूप उत्साही आणि आनंदात आहे.'
मोहम्मद अझरुद्दीनने सय्यद मुश्ताक अली करंडकात ताबडतोड शतक झळकावले. यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला. आतापर्यंत त्याने २४ टी-२० सामने खेळली आहेत. यात त्याने ४५१ धावा केल्या आहेत. टी-२० फॉरमॅटमध्ये अझरुद्दीनचा स्ट्राइट रेट १४२ इतका आहे. त्यामुळे तो आरसीबीसाठी उपयुक्त ठरू शकतो.
हेही वाचा - चेन्नई खेळपट्टी वाद : प्रत्येक संघ होम अॅडव्हान्टेज घेतो, रोहितने टीकाकारांना सुनावलं
हेही वाचा - कॉनवेची नाबाद ९९ धावांची खेळी पाहून अश्विन म्हणाला, 'तुला चार दिवस उशीर झाला'