धर्मशाला - ऑस्ट्रेलियात २०२० मध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वकरंडकाच्या पार्श्वभूमिवर भारतीय संघाची बांधणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दक्षिण आफ्रिका विरुध्दच्या टी-२० मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संधीचे सोने करा, अथवा संघात स्थान मिळवणे कठिण जाईल, असा इशारा कर्णधार विराट कोहलीने दिला आहे.
हेही वाचा - India vs South Africa, १st T-२०: पावसामुळे पहिला सामना रद्द
एका वृत्तवाहिनीशी बोलताना विराट म्हणाला, 'आगामी विश्वकरंडकामध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंनाच स्थान देण्यात येईल. यामुळे संधी मिळालेल्या युवा खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करावे. प्रत्येक युवा खेळाडूला स्वतःला सिध्द करण्यासाठी मोजक्या संधी मिळतील, त्यात त्यांनी आपली प्रतिभा दाखवत चांगला खेळ करावा. अन्यथा टीम इंडियात राहणे कठिण होईल.'
'मी जेव्हा संघात आलो होते. तेव्हा मला स्वतःला सिध्द करण्यासाठी १५ संधी मिळाल्या. आता तुम्हाला ५ वेळाच संधी मिळू शकेल. यात तुम्हाला चांगला खेळ करुन संघात स्थान मिळवावे लागणार आहे. जो खेळाडू संधीचा फायदा घेऊन चांगला खेळ करेल त्याला संघात स्थान मिळेल,' असे विराटने सांगितलं.
हेही वाचा - निवृत्तीनंतर यू टर्न, अंबाती रायुडू थेट 'कर्णधार' म्हणून मैदानात उतरणार
'विश्वकरंडकापूर्वी भारतीय संघ अंदाजे ३० टी-२० सामने खेळू शकेल. त्यामुळे मला वाटत की प्रत्येकाला ४ ते ५ सामने खेळण्यासाठी मिळू शकतात. मला जास्त संधी मिळाली. पण मी असा कधी विचार केला नव्हता.' असेही विराट म्हणाला.
दरम्यान, निवड समितीने विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने संघामध्ये युवा खेळाडूंना संधी देऊन चाचपणी करण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे. याच रणनितीचा एक भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टी-२० मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात निवडण्यात आले आहे.