मुंबई - भारतीय कर्णधार विराट कोहलीने रांची येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकताना ऐतिहासिक कामगिरी केली. विराटने कर्णधार म्हणून सर्वात कमी डावात ४ हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर होता.
विराटने रांची येथील एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करताना कारकिर्दीतले ४१ वे शतक झळकावले. विराटने ९५ चेंडूवर १२३ धावांची खेळी केली. या मालिकेतील विराटचे हे सलग दुसरे शतक ठरले. याआधी नागपूर येथील सामन्यात विराटने शतक झळकावले होते. विराटने रांची येथे २७ धावा करताच कर्णधार म्हणून ४ हजार धावांचा पल्ला गाठला. त्याने हा पल्ला अवघ्या ६३ डावांत पूर्ण केला. विराटच्या आधी डिव्हिलिअर्सने ७७ डावांत हा पल्ला गाठला होता.
सर्वात कमी डावांत ४ हजार धावा करणारे कर्णधार
१. विराट कोहली (भारत) - ६३ डाव
२. एबी डिव्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका) - ७७ डाव
३. महेंद्रसिंह धोनी (भारत) - १०० डाव
४. सौरव गांगुली (भारत) - १०३ डाव
५. सनथ जयसुर्या (श्रीलंका) - १०६ डाव