अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. इंग्लंडने हा सामना ८ गडी राखून सहज जिंकला आणि पाच सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताच्या या मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली.
सामना संपल्यानंतर विराट म्हणाला, 'आम्हाला आतापर्यंत हे कळालेलं नाही की, अशा खेळपट्टीवर काय करायला हवे. आमच्या शॉटची निवड चुकली. आता आम्हाला अधिक जोमाने आणि योजनाबद्ध खेळ करत वापसी करावी लागेल. या परिस्थितीत चूक सहन केली जाणार नाही.'
इंग्लंड संघाने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. फलंदाजीबाबत आम्हाला मान्यच करावं लागेल की, आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. श्रेयसने चांगली फलंदाजी केली. परंतु आम्हाला मोठं लक्ष्य उभारता आलं नाही. अशा घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होतात. चढ-उतार येत राहतात. पण चांगला खेळ करत वापसी करावे लागेल, असे देखील विराटने सांगितले.
इंग्लंडची मालिकेत आघाडी -
पहिल्या टी-२० भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ठेवलेले ७ बाद १२४ धावांचे माफक लक्ष्य पाहुण्या संघाने सहज पार केले. जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी ८ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. जेसन रॉयनं ३२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. डेवीड मलान २४, तर जॉनी बेअरस्टो २६ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडने ८ विकेट्स व २७ चेंडू राखून हा सामना जिंकला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
हेही वाचा - IND Women VS SA Women ३rd ODI : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय
हेही वाचा - IND vs ENG: पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा दारुण पराभव; इंग्लंडची आघाडी