लंडन - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला सरावादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे भारताच्या सलामीच्या सामन्या विराट खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट हा पूर्णपणे फिट असून तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वकरंडकाच्या आठव्या सामन्यात द रोझ बोल क्रिकेट मैदानावर आमने सामने येणार आहेत. विराटला १ जूनला भारताच्या सराव सत्रादरम्यान दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर भारताचे फिजिओ पॅट्रीक फराहत यांनी त्याच्यावर तात्काळ उपचार करत विराटच्या अंगठ्यावर स्प्रे मारुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कोहली सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर साशंकता निर्माण झाली होती. मात्र आता पूर्णपणे फिट असल्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात तो खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.