सिडनी - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये सर्व प्रकारात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकणारा पहिला आशियाई आणि भारतीय कर्णधार ठरला. भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात देत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा - आयसीसी कसोटी क्रमवारी : केन विल्यम्सन दुसऱ्या स्थानी
कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने २०१८-१९मध्ये कसोटी मालिका २-१ने जिंकली होती. त्यानंतर त्यांनी एकदिवसीय मालिका २-१ने जिंकली. याशिवाय, त्यांनी ऑस्ट्रेलिया दौर्यावर टी-२० मालिकाही खिशात टाकली. सध्या सुरू असलेल्या टी-२० या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी सिडनी येथे खेळला जाईल.
२०१६मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टी-२० मालिकेत भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३-० असे निर्भेळ यश मिळवले होते. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७-०८मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगी मालिकेतही विजय साकारला. मात्र कसोटी मालिका जिंकण्यात धोनी अपयशी ठरला. २०११-१२मध्ये त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने चार सामन्यांची कसोटी मालिका गमावली. २०१५-१६मध्येही भारताने एकदिवसीय मालिका १-४ने गमावली. धोनीच्या नेतृत्वातच २०१ २०१४-१५मध्ये भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता.
२००७-०८मध्ये धोनीच्या नेतृत्वात तिरंगी मालिका जिंकण्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कधीही मालिका जिंकली नव्हती. आतापर्यंत कसोटी खेळणाऱ्या आशियाई देशाने ऑस्ट्रेलियात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.