बंगळुरू - आयपीएलमध्ये गुरुवारी २८ मार्चला सातवा सामना आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होईल. बंगळुरूच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघात स्टार खेळाडूंचा भरणा आहे. त्यांना या सामन्यात काही विक्रम करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे या सामन्यात रोहित शर्मा आणि कोहलीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहीलला ५ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ४६ धावांची गरज आहे. विराटने आतापर्यत आयपीएलच्या १४६ सामन्यात ४९५४ धावा केल्या आहेत. सुरैश रैनाने ५ हजार धावा करण्यासाठी १७७ सामने खेळले आहेत.
रोहित शर्माने उद्याच्या सामन्यात १६ षटकार मारले तर तो आयपीएलमध्ये २०० षटकार मारण्याचा पराक्रम करेल. गेलनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरेल.
क्रिकेट ३६० नावाने प्रसिध्द असलेला एबी डिविलियर्सला ४ हजार धावा करण्यासाठी ३८ धावा काढव्या लागतील. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील नववा तर गेल, वॉर्नर यांच्यानंतर तिसरा विदेशी खेळाडू ठरेल.
युवराज सिंगने आयपीएलमध्ये आतापर्यंत १४६ षटकार मारले आहेत. षटकारांचे दीड शतक करण्यासाठी त्याला आता केवळ ४ षटकारांची गरज आहे.