हैदराबाद - कोणत्याही संघाचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कर्णधाराला आणि प्रशिक्षकांना काळजी वाटते. परंतु, हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे फलंदाज बाद होत असताना कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री खूश होत होते, असे खुद्द विराटने पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २३७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची ४ बाद ९९ अशी स्थिती झाली होती. ऑस्ट्रेलिया सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, भारताच्या अशा कठीण परिस्थितीत विराट आणि शास्त्री खूश होते. कोहलीने याचे कारण देताना सांगितले की, भारताचे ९९ धावांवर ३ फलंदाज बाद झाल्यानंतर शास्त्रींबरोबर चर्चा करताना संघासाठी ही परिस्थिती चांगली असल्याचे आम्ही एकमेकांशी बोलत होतो.
९९ धावांवरती चौथा गडी बाद झाल्यांनतर मी शास्त्रींना म्हटले, हे चांगले झाले. आता मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार. याबरोबरच त्यांना स्वत:ची कामगिरी दाखवण्याची संधी देखील मिळणार. ज्याप्रकारे केदार जाधव आणि धोनीने फलंदाजी केली, ते पाहुन आम्ही खूश आहोत, असेही विराट म्हणाला.
सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर केदार जाधवने नाबाद ८१ धावा आणि धोनीनेही नाबाद ५९ धावा करताना संघाला विजय मिळवून दिला होता. दोघांनी पाचव्या गड्यासाठी विक्रमी १४१ धावांची भागीदारी केली होती. केदारला ८१ धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.