चेन्नई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आता वडील झाल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो सज्ज झाला आहे. विराटने अॅडलेडमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो पितृत्वाच्या कारणासाठी मायदेशी परतला. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिकाविजय नोंदवला.
हेही वाचा - वॉर्नरच्या मुलीला विराटचे 'खास' गिफ्ट
भारताला आता इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पहिला सामना ५ फेब्रुवारीला खेळला जाणार असून कर्णधार कोहली या कसोटीद्वारे संघात परतणार आहे. इतकेच नव्हे तर, एका खास विक्रमासाठी त्याला १४ धावांची आवश्यकता आहे. या कामगिरीमुळे तो यंदाच्या वर्षाची उत्तम सुरुवात करू शकतो.
कसोटी कर्णधार म्हणून विराटच्या नावावर ५२२० धावा आहेत. आता यात १४ धावांची भर घातल्यास विराट कसोटी कर्णधार म्हणून विंडीजचे दिग्गज माजी कर्णधार क्लाईव्ह लॉयड यांना मागे टाकेल. या विक्रमात कोहली आणि लॉयड यांच्या पुढे ग्रॅमी स्मिथ (८६५९), अॅलन बॉर्डर (६६२३) आणि रिकी पाँटिंग (६५४२) हे महान खेळाडू आहेत.
इंग्लंडविरुद्ध भारताला ४ कसोटी सामने, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. इंग्लंडचे खेळाडू रोरी बर्न्स, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांनी या मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. तिन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. या तिन्ही खेळाडूंनी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये प्रशिक्षणही सुरू केले आहे.