रांची - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. विराटने फॉलोऑन दिल्यानंतर, पाहुण्या संघाचे पाच गडी अवघ्या ३६ धावांवर माघारी गेले. त्यामुळे भारताला मोठा विजय मिळणार हे निश्चित झाले आहे.
हेही वाचा - मार्क मार्क्वेझचा पराक्रम, जिंकली जपान ग्रां.पी. स्पर्धा
आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारताने आफ्रिकेला फॉलोऑन दिला होता. या फॉलोऑनमुळे भारताला पुण्यातील कसोटीत डावाने विजय साध्य करता आला. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळ फॉलोऑन देणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये विराटने अव्वल स्थान पटकावले आहे.
किंग कोहलीने प्रतिस्पर्धी संघाला आठव्यांदा फॉलोऑन दिला आहे. त्याने या विक्रमात भारताचा दिग्गज कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला पछाडले. अझरुद्दीनने सात वेळा प्रतिस्पर्धी संघाला दिला होता. अझरुद्दीननंतर, महेंद्रसिंग धोनी (५), सौरव गांगुली (४) या विक्रमात पिछाडीवर आहेत.
तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने आपला पहिला डाव ९ बाद ४९७ धावांवर घोषित केला. रोहित शर्माचे (२१२) द्विशतक आणि अजिंक्य रहाणेचे (११५) शतक या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर धावांचे डोंगर उभारला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जडेजा आणि साहाच्या जोडीने भारताला चारशेचा टप्पा पार करून दिला. संघाची धावसंख्या ४१७ असताना साहा (२४) बाद झाला. रवींद्र जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाची धावसंख्या ४५० असताना तो ही परतला. जडेजा (५१) पाठोपाठ आर अश्विनही (१४) स्वस्तात माघारी परतला. गोलंदाज उमेश यादवने आक्रमक ३१ धावा झोडपल्या. त्यानंतर मोहम्मद शमी नदीमची जोडी मैदानात असताना कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.